अहमदनगर – अहमदनगर शहरात अवैधरित्या तलवार, गुप्ती, सुरे शस्त्रसाठा बाळगणारी मुकुंदनगर परिसरातील टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे. या टोळीकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. साबीर अस्लम सय्यद (वय १९), समी मुजीब शेख (वय १९), अजहर गफ्फार शेख (वय २०, सर्व रा.गोविंदपूरा, मुकुंदनगर) व १ अल्पवयीन मुलगा अशी पकडलेल्या चौघांची नावे आहेत. तर दोघेजण काटवनामध्ये फरार झाले आहेत.
आगामी आषाढी एकादशी, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अवैध शस्त्र बाळगणार्यांबाबत विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक शहरात माहिती घेत होते. अशातच पो.नि. दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, नगर ते भिंगार जाणार्या रोडवर भिंगार नाला परिसरात एका टोळीकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आहे. ही माहिती मिळताच पो.नि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव, साहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पो.हे.कॉ. बापूसाहेब फोलाणे, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डिले, भिमराज खर्से, विजय ठोंबरे, संतोष लोंढे, मेघराज कोल्हे, अमृत आढाव, उमाकांत गावडे यांना कारवाईसाठी पाठविले.
या पथकाने भिंगार नाला परिसरात जावून सापळा लावला असता जवळील काटवनातून ६ इसम पायी येताना दिसले. त्यांच्या हातात काळ्या रंगाची बॅग व पांढर्या रंगाची गोणी होती. या सर्वांवर पथकाने झडप टाकून त्यांना पकडले. या झटापटीत दोघेजण पळून गेले. पकडलेल्या चौघांकडून १ तलवार, १ गुप्ती, १० धारदार सुरे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पळून गेलेल्या आरोपींमध्ये आयान समीर खान व सौरभ कथुरिया (दोघे रा.मुकुंदनगर) यांचा समावेश असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या सर्वांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.