मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर, भर मंचावर रडले, अजित पवारांना उद्देशून म्हणाले…

0
16

तुमच्या ताकदीवर अनेक संकटं पेलून उभा राहिलो आहे, असे म्हणत मतदारांचे आभार मानत असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. कोल्हापूरच्या कागलमधील सागांव येथे सोमवारी (२९ जानेवारी) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात बोलत असताना स्थानिक आमदार, वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. माझ्या जीवनात दोन वेळा राजकीय संकटं आली, परंतु, मतदार पाठीशी असल्यामुळे मी दोन्ही संकटं पेलून नेली, असं मुश्रीफ यावेळी म्हणाले.

हसन मुश्रीफ जनतेला उद्देशून म्हणाले, तुमच्या ताकदीवर आजपर्यंत मी अनेक संकट लीलया पेलून नेली आहेत. आपण अनेक संकटांमधून बाहेर पडलो आहोत. यासाठी मी मतदारसंघातल्या जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. आजपर्यंत जी संकटं आली, त्यातून आपण बाहेर पडलो. माझ्या कारकिर्दीत दोन वेळा माझ्यावर राजकीय संकटं आली. या काळात मला तुमच्याकडून प्रचंड प्रमाणात साथ मिळाली. जनता माझ्या पाठिशी होती. तुमचा आशीर्वाद होता. त्यामुळेच मी मतदारसंघातल्या सहा निवडणुका जिंकलो. आता मी सातवी निवडणूक लढणार आहे. एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावं ते माझ्या तालुक्यातल्या जनतेने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मी या जनतेचा आभारी आहे.