राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्ययावर जोरदार टीका केली. अजित पवार यांना भाजप युतीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम आवडले. सर्वसामान्यांसाठीची तळमळ पाहून ते आमच्या दिंडीत, आम्ही राबवत असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलं. तर रोहित पवार यांना बारामतीचे पार्सल असं म्हणत टोला लगावला.
बारामतीचं पॅकेज या ठिकाणी आलं होतं. बालिशपणा संपवा, आपण कोणाविषयी बोलतो आणि काय बोलतो हेसुद्धा माहिती नाही. आपलं वय किती, आपण बोलतो किती? आपण त्या घरात जन्माला आलो म्हणून सर्वसामान्यावर बोलायचा अधिकार परमेश्वराने दिलाय का? पुढच्यावेळी असं बोलायचा प्रयत्न केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. आम्ही जनतेसाठी काम करतोय तर मग तुमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. तुमच्या पक्षाचा कणखर नेता उपमुख्यमंत्री म्हणून आमच्याच पक्षात आला. आम्ही नेता फोडला नाही, ज्यांना जे भावतंय ते येतायत.






