राज्यात अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा,हवामान खात्याने जारी केला अलर्ट

0
17

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. दुसरीकडे खरीप हंगामातील पिकांना देखील पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज रविवारी देखील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे या भागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडणार, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुबार, धुळे, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेश लगतच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे.