सोमवार हा जुन्या संसद भवनातील कामकाजाचा अखेरचा दिवस ठरला. असे असले तरी, जुन्या संसद भवन इमारतीचे महत्त्व यापुढील काळातही भारतीय स्वातंत्र्यलढा व लोकशाहीचे स्मरण पुढच्या पिढ्यांसाठी ताजेतवाने ठेवणारी वास्तू म्हणून सदैव कायम राहणार आहे. या इमारतीच्या एका भागातील राष्ट्रीय अभिलेखागार नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे.
सध्याच्या संसदेच्याच शेजारी बांधलेल्या नवीन संसद भवनात आज, मंगळवारपासून कामकाजाचे स्थलांतर झाले तरी सध्याची गोलाकार इमारत पाडली जाणार असल्याची चर्चा पूर्ण निराधार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. संसदीय परिचर्चा, प्रशिक्षण वर्ग व अन्य कार्यक्रमांसाठी अधिक जागा निर्माण करण्यासाठी या इमारतीच्या काही भागाची नव्याने सजावट (रेट्रोफिटींग) केली जाईल. ही ऐतिहासिक वास्तू देशाची पुरातत्त्व संपत्ती असल्याने त्याचे जतन केले जाईल असे स्पष्ट करताना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्यसभेत २०२१मध्ये सांगितले होते की, सध्याच्या संरचनेची दुरुस्ती केली जाईल. जुन्या संसद इमारतीचा काही भाग संग्रहालयात रूपांतरित केला जाईल.






