आपला भाऊ मुख्यमंत्री असताना राज्याचे कौतुक करायचे नाही, हे राज ठाकरेंनी ठरवलेले दिसते – ना. जयंत पाटील
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागे गुजरातचे कौतुक केले. आता ते युपीचे कौतुक करत आहेत. महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यांचे कौतुक करण्यासाठी राज ठाकरे दौरे करतील. जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलेले दिसते, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी मनसेवर केली.
भारतात महागाई प्रचंड वाढलेली आहे. अशावेळी विविध विषयांकडे लक्ष वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. आपल्या शेजारी असलेल्या श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये देखील महागाई वाढलेली दिसते. मात्र आपल्याकडे केंद्र सरकार महागाईचे खापर राज्यांवर फोडून मोकळे होत आहे. महागाईचे मूळ केंद्रातच आहे, हे विसरुन चालणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजप-राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा सुरु केली, त्यावर बोलत असताना जयंत पाटील म्हणाले की, मी चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. आशिष शेलार म्हणतात त्याप्रमाणे चर्चा झाल्याचे मला तरी वाटत नाही. आमची काँग्रेसबरोबर त्यावेळी आघाडी होती. त्याकाळात भाजप व शिवसेनेची सत्ता असतानाही भाजपला आमच्याशी चर्चा का करावीशी वाटली? असा प्रतिप्रश्न मा. जयंत पाटील यांनी विचारला.
भाजप-मनसेच्या युतीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सकारात्मक असल्याच्या चर्चेबाबत प्रश्न विचारला असता मा. जयंत पाटील म्हणाले की, संघ ही अराजकीय संघटना आहे. त्यांचा राजकारणाशी संबंध नाही. अशा चर्चांमध्ये संघाचे नाव आणून भाजपची मंडळी संघालाच बदनाम करत आहेत. मनसेबरोबर भाजपने युती केल्यास मुंबईतील उत्तर भारतीय लोक लांब जातील, याची माहिती भाजपला आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीची चर्चा संघाकडून सुरु झाली असल्याचे चित्र मुद्दामहून निर्माण केले जात आहे, असे ते म्हणाले.