सध्या महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. बीडमधल्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. या प्रकरणात त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. दरम्यान करुणा शर्मा अर्थात करुणा धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.
आमदार सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांच्या वाहनात पिस्तूल ठेवणारे पोलिसच होते, असा दावा केला होता. यावर करुणा मुंडे यांनी त्यांचे आभार मानत गुंडगिरीचा पर्दाफाश करण्याची मागणी त्यांनी आमदार सुरेश धस यांच्याकडे केली. सुरेश धसभाऊ माझ्याकडे खूप पुरावे आहेत, मला तुम्ही वेळ द्या…मी सर्व पुरावे घेऊन तुमच्याकडे येते, असं करुणा धनंजय मुंडे म्हणाल्या. पिस्तूल ठेवण्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मारहाणीपर्यंतचे पुरावे असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले.






