लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, ‘ते’ अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा

0
34

लाडकी बहिण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ‘लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अर्जांची छाननी होणार आहे. ज्या लाभार्थीबाबत तक्रारी आल्या आहेत. त्या लाभार्थी महिलांचे अर्ज तपासून बाद केले जाणार आहेत.’, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘काही लाभार्थी महिलांचे अर्ज आले आहेत. यामधील एका लाभार्थीने मला अर्ज करत सांगितले होते की, माझं लग्न झाले आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये स्थलांतरीत झाली आहे. त्यामुळे मी या योजनेसाठी पात्र होणार नाही. तसंच, काहींनी आधार कार्ड सिडींग करत असताना मी चुकीचा नंबर टाकला, मला सरकारी नोकरी लागली आहे, आमच्या उत्पन्नात वाढ झाली आहे त्यामुळे आम्ही या योजनेसाठी पात्र होत नाही अशाप्रकारची माहिती अर्जाद्वारे देण्यात आली आहे. अशा सर्वांचे अर्ज हे तपासले जाऊन ते बाद केले जाणार आहेत.
राज्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये हफ्ता दिला जातो. आतापर्यंत सहा हफ्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक अकाऊंटमध्ये जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये सहा हप्त्याचे पैसे म्हणजेच ९००० रुपये जमा झाले आहेत.

या महिलांना मिळतोय लाडक्या बहीण योजनेचा लाभ –
– ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

– ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो, अशा महिलांनादेखील या योजनेचा हप्ता मिळणार नाही.

– ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत किंवा ज्यांना पेन्शन मिळत आहे, अशा महिलादेखील या योजनेसाठी पात्र नाहीत.

– ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे खासदार किंवा आमदार आहे त्यादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.