भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील हा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकरांनी विधान परिषद निवडणुकीतील सत्यजित तांबे अपक्ष उमेदवारीच्या आडून भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी काँग्रेसलाही टोला लगावला आहे.
काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही प्रयत्नशील आहेत. ती खेळी माझ्या अंदाजानं बाळासाहेब थोरात विरोधात राधाकृष्ण विखे पाटील अशी आहे, असं मी त्या ठिकाणी मानतो. देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही, परंतु भाजपचा नवीन मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा राधाकृष्ण विखे पाटील होऊ शकतात. त्याचबरोबर जी काही नगरमधली खेळी झालेली आहे, त्यातून बाळासाहेब थोरातांनाही इच्छा झालेली दिसतेय की, आपण काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा व्हावं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.