देशातील लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपताच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळणार नाही असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीला पराभव स्वीकारावा लागेल अशी शक्यता आहे. टिव्ही ९ च्या अंदाजानुसार नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील पिछाडीवर असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके विजयी होण्याची शक्यता आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पराभूत करतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.