MAH CET विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, या उद्देशाने सीईटी कक्षाने डिसेंबरमध्येच नव्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार १६ मार्च ते २७ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. या संभाव्य वेळापत्रकानुसार मार्च महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षांसाठीची नोंदणी सीईटी कक्षाने टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे.
यात एमएड, एमपीएड, एमबीए, एमएमएस, लॉ-तीन वर्षे, एमएचटी सीईटी, हॉटेल मॅनेजमेंट पदवी, बीपीएड, एमसीए या अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन अर्जनोंदणीला डिसेंबरमध्येच सुरुवात झाली. आता नव्या वर्षात सीईटी कक्षाने शुक्रवारपासून बीबीए आणि बीसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्जनोंदणी सुरू केली. संभाव्य वेळापत्रकानुसार या अभ्यासक्रमांची सीईटी १ ते ३ एप्रिलदरम्यान होणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार एम-एचएमसीटीची सीईटी २७ मार्च रोजी होणार असून बी-डीझाइनची सीईटी २९ मार्च रोजी प्रस्तावित आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू केलेल्या अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक आणि इतर माहिती सीईटी कक्षाच्या https://www.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.






