भाजप एवढा मोठा पक्ष होता, तर…अजित पवारांना फोडण्याची गरज नव्हती….

0
20

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की एकनाथ शिंदे सोबत आल्यावर फायदा होईल. आता ते म्हणातात की अजित पवार सोबत आल्यामुळे फायदा होणार आहे. परत दोन महिन्यांनी म्हणतील आपला साराच बेस निघून गेला. भाजप एवढा मोठा पक्ष होता, तर अजित पवारांना फोडण्याची गरज नव्हती. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मी भाजप युतीबरोबर गेलो होतो, गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. मात्र आताचे नेते हे गोपीनाथ मुंडे यांच्या पेक्षा हुशार आहेत, असा खोचक टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लगावला आहे. तसेच त्यांना आता आमची गरज नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे लागणे यात काही अर्थ नाही असंही जानकर म्हणाले.

राष्ट्रीय समाज पक्षाने सध्या राज्यभर यात्रा सुरू केली असून, तिचे शनिवारी दुपारी नगरमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी जनाकर बोलत होते. ते म्हणाले, ही यात्रा काही कुणाला विरोध करण्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी काढली आहे. शेतकर्यांच्या, युवकांच्या सर्वसमान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात ही रथ यात्रा काढली असून राष्ट्रीय समाज पक्ष देशात आगामी लोकसभेच्या निवडणुका स्व बळावर लढणार आहे. लोकसभेच्या 543 जागा आम्ही लढवणार असून चार राज्यांमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळत चालली आहे.
काही राज्यांमध्ये विजय देखील मिळेल तर स्वतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधून निवडणूक लढणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली. पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलले जात असल्याची चर्चा नेहमीच रंगते, यावर बोलताना जानकर म्हणाले की, पंकजा मुंडे सध्या भाजपमध्ये राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांना जर भाजपमध्ये जास्तच त्रास झाला तर आम्ही बहीण म्हणून साडीचोळी घेऊन त्यांना आणायला जाऊ. राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून त्यांना काय करायचं ते करू देवू असे सांगत, आता मी फक्त त्यांना एवढंच म्हणेन की ‘दिल्या घरी सुखी रहा’ असं जानकर म्हणाले.