अहिल्यानगर : वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरच्या मातीत रंगणार असून, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अहिल्यानगरला आनंदाची बातमी मिळाली आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धा २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान वाडिया पार्क येथे आयोजित केली आहे. शहर व जिल्हा संघांनी शहर व जिल्हा कुस्तीगीर, तालीम संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात याव्यात, निवड चाचणीतून निवडलेला संघाची गादी व माती, अशी वेगवेगळी प्रवेशिका संघाच्या लेटरहेडवरती खेळाडू, मार्गदर्शक व व्यवस्थापकांच्या नावासह २५ जानेवारी पूर्वी मेलवर व किंवा पत्त्यावर पाठवावे, असे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने सांगितले आहे.
कुस्तीगीर ज्या शहर, जिल्हा संघातून सहभागी होणार आहे , तो त्या शहर, जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुस्तीगिरांची जन्म तारीख २००४ व त्या पूर्वीची असावी, तसेच २००५ व २००६ मध्ये जन्मलेल्या कुस्तीगिरास मेडिकल सर्टिफिकेट व पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. वयाचा व रहिवासी पुरावा म्हणून ओरिजनल आधार कार्ड, अथवा पासपोर्ट ग्राह्य धरण्यात येईल. रेल्वे व आर्मीमध्ये नोकरीस असलेल्या कुस्तीगिरास या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही, ग्रीकरोमण राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेत्या कुस्तीगिरास स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
वजनगट गादी व माती : ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२ व ९७, महाराष्ट्र केसरी गट ८६ ते १२५ किलो. वार्षिक सर्वसाधारण सभेतून कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा व पुणे जिल्हा संघास या स्पर्धेसाठी ‘अ’ व ‘ब’ असे दोन संघ पाठविण्यास पात्र आहेत.
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी व राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास देण्यात आला होता. या प्रस्तावावर निर्णय होऊन ही स्पर्धा अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघास घेण्याचे पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती सचिव प्रा. डॉ. संतोष भुजबळ यांनी दिली. महाराष्ट्रातील कुस्तीगीरांतर्फे आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंद केसरी योगेश दोडके, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगिर संघाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, उपाध्यक्ष अर्जुन देवा शेळके, खजिनदार शिवाजी चव्हाण, कार्यालयीन सचिव नीलेश मदने, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव कराळे, शंकर खोसे, धनंजय खसे॔, दत्तात्रय खैरे, दादासाहेब पांडुळे, अतुल कावळे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. संभाजी निकाळजे, नेवासा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष प्राचार्य सोपान बाजीराव काळे, संदीप कर्डिले, शुभम जाधव, योगेश चंदेल आदी उपस्थित होते.