महादेव जानकर लोकसभा स्वबळावर लढणार…नगर दक्षिणेत उमेदवार जाहीर…

0
26

नगर : भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी देशाची वाट लावली. भाजपबरोबर आम्ही युती केली, मात्र त्यांनी आमच्या तोंडाला पाने पुसली. आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.

माजी मंत्री जानकर यांच्या उपस्थितीत नगर लोकसभा मतदारसंघाचा मेळावा नगर शहरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाने नगरसह बारामती, शिरूर, परभणी, माढा, नंदुरबार आदी जागांवर लोकसभा निवडणुकीची तयारी केल्याचे सांगताना नगरमधून रवींद्र कोठारी यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपने दोन जागा दिल्या तरच ‘रासप’ त्यांच्याशी युती करण्याचा विचार करेल, अन्यथा शरद पवार तीन जागा देण्यास तयार आहेत, असाही दावा जानकर यांनी केला. शिर्डीच्या जागेसाठी भाऊसाहेब वाकचौरे माझ्या संपर्कात येताच त्यांना उद्धव ठाकरे यांनी बोलवून लोकसभेची तिकीट देत असल्याचे सांगितले, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे देखील माझ्या संपर्कात आहेत, असाही दावा त्यांनी केला. भाजपकडे आज ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, न्यायालय आहेत मात्र आमच्याकडे जनता आहे. भाजपला रोखायचे असेल तर त्यांचा आमदार मत मागायला आल्यानंतर त्यांना तुम्ही आमच्यासाठी काय केले, असा प्रश्न विचारा असेही आवाहन जानकर यांनी केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी रवींद्र कोठारी, डॉ. प्रल्हाद पाटील, शरद भास्कर, शहाजी तोडकर, सुवर्णा जराड, मंदाकिनी बडेकर, नाना झुंजरे आदी उपस्थित होते.