आमच्याकडे एका मोठ्या पक्षाचे नेते आले होते. त्यांच्यासोबत दुसरे नेतेही आले आणि त्यांनी आम्हाला आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दाखवलं मग आम्ही राष्ट्रपती राजवट का उठवू नको? राजकारणात एका क्षणात गोष्टी बदलतात मग एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठली तर त्यात नवल काय? असं माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. तसंच पहाटेच्या शपथविधीबाबत खुलासाही केला आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोटही केला आहे. दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दाखवलं त्यानंतर शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. पुढे कोर्टात जेव्हा आव्हान देण्यात आलं त्यावेळी त्यांनी माघार घेत राजीनामा दिला. राज्यपाल कधीही शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात ते बोलवत असतात. मी ज्यांना शपथ दिली त्यांनी याबाबतचं सत्य सांगितलं आहे.






