सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे राज्याच्या सत्ता संघर्षाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यातील सरकार जाणार की राहणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राज्यातील सरकार कोसळेल काय? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय वाटते? याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. सरकार पडण्याची मला कसलीही भीती वाटत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
‘टीव्ही 9 मराठी’ने दादरच्या वीर सावरकर स्मारकात महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली परखड मते मांडली. आमचं सरकार लोकांच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे सरकार पडण्याची भीती माझ्या मनात नाही. मला कसलीही भीती वाटत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.