मुंबई : राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ महाविकास आघाडीला विधानपरिषदेच्या निवडणुकीत देखील मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवादर चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसताना देखील भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. त्यामुळे आता काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विधान परिषदेच्या पराभवानंतर मविआमधील मतभेद समोर येत आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नसीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता सरकारमध्ये राहायला पाहिजे का, याचा विचार करण्याची गरज असल्याचे काँग्रेस नेते नसीम खान यांनी म्हटले आहे.