मनोज जरांगे पाटील यांची आज बीडच्या नारायण गडावर बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी नारायण गडावर 8 जूनला भव्य सभा होणार असल्याची माहिती दिली. तसेच या सभेत 6 कोटी मराठे एकत्र येणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी सरकारला सगेसोयरीची अधिसूचना जारी करण्याचं आवाहन केलं. “मी स्वार्थी नव्हतो, नाहीतर मी या मराठ्यांच्या लाटेत निवडून दिल्लीला गेलो असतो. निवडणुकीत आमच्या गाडीला कोणीही स्टीकर लावू नका, आणि कोणी लावूनही घेऊ नये. आपलं वाईट झालं तरीही तुम्हाला राग चीड का येत नाही? सहा करोड मराठे तुम्ही काय कामाचे? जात जगविली नाही तर भविष्यात कोणीही जिवंत राहणार नाही. आपली आज जात एकत्र आल्याने अनेक लोक जळत आहेत. मला काहीही देऊ शकतील. मला पद देऊन कोट्यवधी रुपये मिळाले असते. मला राज्यातून तडीपार केल्यास मी इतर राज्यात जाईन, तिथं आंदोलन करेन. जेलमध्ये टाकले तर मी कैद्यांना घेऊन आंदोलन करेन. मी शिव्या घातल्या म्हणून एसआयटी नेमली. तुम्ही आमच्या आई-बहिणीला मारले, ते काहीच नाही का?”, असं मनोज जरांगे म्हणाले.
माझ्या आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना फोडण्याचे काम सुरू आहे. एका व्यक्तीला 15 लाख रुपये देऊन आमिष देण्यात येत आहे. असे असेल तर दोन तासात मराठे 5 हजार कोटी जमा करतील”, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.