मग मी कशाला बसलोय…..आंदोलनकर्त्यांवर मनोज जरांगे संतापले?

0
50

गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. या आठ दिवसांत अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्तेतील नेत्यांनीही जरांगे पाटलांना आंदोलनासाठी बळ दिलं आहे. दरम्यान, आज सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांशी चर्चा करायला उपोषण स्थळी आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना जरांगे पाटलांनी खडेबोल सुनावले आहेत.

अर्जुन खोतकर, गिरीश महाजन यांची मनोज जरांगे पाटलांशी चर्चा सुरू असतानाच आंदोलनकर्त्यांनी उपोषणस्थळी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. घोषणाबाजी करू नका, असं बजावूनही कार्यकर्ते शांत बसले नाहीत. त्यामुळे चर्चेत व्यत्यय येत असल्याने मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्यांवर संतापले.

“सरकारबरोबची चर्चा बंद करायची का?” असा संतप्त सवाल जरांगे पाटलांनी कार्यकर्त्यांना विचारला. “त्यांनी आरक्षण दिलं नाही, तरी ५० वेळा सांगितलं घोषणा देऊन देऊन उभ्या आयुष्याचं वाटोळं झालं. भानावर या ना आता तरी. ते चर्चेला आले आहेत. आपण चर्चा करू, आपल्याला नाही पटलं तर ते परत जातील. ठरवू ना काय करायचं. लगेच पाहिजे आरक्षण? मग मी कशाला बसलोय? लगेच पाहिजे म्हणूनच बसलोय ना”, अशा रागाच्या सुरात त्यांनी आंदोलकांना खडसावले.
आंदोलन मागे घेणार नाही, पण सरकारला चार दिवसांचा वेळ देत असल्याचे शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी आपण सरकारला चार दिवसांची मुदत देत आहोत. तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.