बई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपाय यंत्रणा अर्थात NIA कडून मुंबई हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. या प्रतिज्ञापत्रात NIA ने धक्कादायक दावा केलाय. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हे प्रदीप शर्मा आहेत आणि कथित कट हा मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या इमारतीतच शिजल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय. प्रदिप शर्मासह इतर आरोपी अनेक बैठकींना उपस्थित होते. सचिन वाझेने मनसुख हिरेनच्या हत्येसाठी प्रदीप शर्मा यांना 45 लाख रुपये दिले होते, असा उल्लेखही एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात केलाय.
एन्टिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेले प्रदीप शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रदीप शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता आणि त्यावर एनआयएचं म्हणणं काय? हे त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावं अशा सूचना हायकोर्टानं एनआयएला दिल्या होत्या. त्यानुसार एनआयएने आज प्रतिज्ञापत्र सादर केलं असून त्यात मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे मुख्य सूत्रधार आहेत आणि सचिन वाझे याने शर्मा यांना त्यासाठी 45 लाख रुपये दिल्याचं या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. तसंच एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या जामिनाला कडाडून विरोध केलाय. याशिवाय मनसुख हिरेन हत्येचा कट पोलीस मुख्यालयात शिजला होता, सचिन वाझेच्या कार्यालयात शिजला होता. त्या बैठकीला इतर आरोपीही हजर होते. तिथेच कट शिजला आणि त्यानुसार मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा इथल्या रेतीबंदरच्या खाडीत टाकण्यात आला, असा दावा एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात केलाय.






