नाभिक समाजाने मराठा समाजाच्या हजामती करू नये, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्यावर बरीच टीका झाली. या टीकेनंतर छगन भुजबळ यांनी एक पाऊल मागे येत त्यावर सारवासारव करण्यास करण्यास सुरूवात केली आहे. नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नये. सभेमध्ये केलेलं वक्तव्य त्या गावापुरतेच मर्यादित असल्याचे ते म्हणाले.
अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार मेळाव्यात नाभिक समाजाबद्दल केलेलं वक्तव्य हे एका बांधवाने त्याच्या गावातील केलेल्या तक्रारीमुळे केलेले असून हे वक्तव्य केवळ त्या गावापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे कुणीही या वक्तव्याचा विपर्यास करू नये अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, एका गावातील नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट केली. त्या नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या दुकानात केस कापायला जायचं नाही, अशी तिथल्या मराठा समाजाने भूमिका घेतली होती. अशी बहिष्काराची भाषा जर कोणी करत असेल तर नाभिक बांधवांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाका असे अहमदनगर येथे ओबीसी भटके विमुक्त एल्गार सभेत आपण आवाहन केले होते.






