. शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयात भक्तांना मोफत भोजन दिलं जातं. मात्र, साई संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे घ्या, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली. एवढंच नाही तर ‘संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतो, तसेच संपूर्ण महाराष्टातील भिकारी येथे गोळा झालेत’, असं विधानही सुजय विखे यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर विविध स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “देशातील भिकारी येथे येऊन जेवतात असं म्हणणं हा साई भक्तांचा अपमान आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
शिर्डीत जगभरातील लोक येतात. श्रद्धेपोटी कोट्यवधींची देणगी देखील देतात. मग शिर्डीतील साई संस्थाने जर एखादा चांगला उपक्रम हाती घेतला तर, आता त्या ठिकाणी येणारा भाविक कोण असतो? तेथे येणारे भाविक हे आंध्र प्रदेशमधून दुपारच्या जेवणासाठी येत नाहीत. अन्नदान हे चांगलं काम आहे. देशातील किंवा महाराष्ट्रातील भिकारी येथे येऊन जेवतो आणि जेवण्यासाठी तो तेथे येतो असं म्हणणं हा साई भक्तांचा अपमान आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.






