आणखी एक बंडखोर आमदार ‘मातोश्री’वर जाण्यास तयार…घातली महत्वाची अट

0
2184

राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यापाठोपाठ शिवसेनेतील आणखी एका बंडखोर आमदाराने, ‘मातोश्रीवरून बोलावणे आल्यास त्याठिकाणी जाऊ’, असे वक्तव्य केले आहे. आमची तर इच्छा आहे आम्हाला उद्धव साहेबांचा फोन यावा आणि आम्हाला मातोश्रीवर बोलवावे, असे वक्तव्य शिंदे गटाचे नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी म्हटले. ते बुधवारी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मात्र, यासाठी सुहास कांदे यांनी एक अटही घातली आहे. मातोश्रीवरून बोलावणे आले तर नक्की जाऊ, मात्र एकटे जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे साहेबांना बोलावलं तरच आम्ही सर्व एकत्र मातोश्रीवर जाऊ, असे कांदे यांनी सांगितले. आमची खदखद ही संजय राऊतांवर नव्हती तर विकास कामांबाबत असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले. ज्या ४० आमदारांच्या मतांवर संजय राऊत खासदार झाले त्यांनाच राऊतांनी ‘रेडा’, ‘डुक्कर’ असे म्हटले, असे सांगत सुहास कांदे यांनी त्यांच्याविषयीची नाराजी व्यक्त केली.