राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचे वाटप केले. दरम्यान, यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवारांना ‘संघर्ष’ शब्दाचा अर्थतरी कळतो आहे, असे ते म्हणाले. एपीबी माझा वृत्तवाहिनीला त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवारांना संघर्ष शब्दाचा अर्थतरी कळतो आहे. रोहित पवारांनी असा कोणता संघर्ष केला आहे, की ते ‘संघर्ष’ नावाचं पुस्तक वाटत आहेत. अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. आज हे लोकं शाहू-फुले-आंबेडकरांची पुस्तकं वाटत आहेत. मात्र, शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्याची पात्रता पवार कुटुंबियांची नाही. ज्या पवारांनी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगलं, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि अर्थमंत्री होतो आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते, त्यांचाच नातू परत आमदार होतो, हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या कोणत्या पुस्तकात लिहिले आहे?” असंही ते म्हणाले.