महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ६ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. या सभेतून राज ठाकरे कुणावर टीका करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून टीझर जारी केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाचा रोख कुणाकडे असेल? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. रत्नागिरीतील सभेबाबत मनसेनं जारी केलेला टीझर सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
संबंधित टीझरमध्ये मनसेनं सध्याच्या राजकारणात वापरल्या जाणाऱ्या विविध शब्दांचा वापर केला आहे. यामध्ये “आरोप-प्रत्यारोप, शिव्या-शाप, सूडभावना, राजकीय चिखल, खोके, उठाव, नाराजीनामा, राजीनामा,फोडाफोडी, गद्दारी, गलिच्छ भाषा आणि बंड” अशा सूचक शब्दांचा समावेश आहे. तसेच टीझरमध्ये पुढे राज ठाकरेंच्या आवाजात “सगळेचजण आपापला विचार करतायत, किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करू…” असा संदेश देण्यात आला आहे.
स्वाभिमानाची पालखी दिमाखात नाचवणाऱ्या कोकणी माणसाच्या समृद्धीसाठी राजगर्जना… ६ मे २०२३, चला रत्नागिरीला !#कोकण_राजगर्जना pic.twitter.com/rMK0q37uSi
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 5, 2023






