कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाबद्दल मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी पत्र लिहित पक्षाचे अभिनंदन केले. हे पत्र किल्लेदार यांनी सोशल मीडियावर शेअर करताना कर्नाटकच्या विजयासाठी काँग्रेसचे अभिनंदन आणि जनमताचा कौल झुगारून घोडेबाजार करणाऱ्यांसाठी बोध, अशी टिप्पणी केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे, असा आरोपही त्यांनी पत्रात केला.
किल्लेदार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ‘कर्नाटकात सन २०१८मध्ये झालेल्या निवडणुकांत नागरिकांनी कुणालाच स्पष्ट बहुमत दिले नव्हते, मात्र काँग्रेस आणि जेडीएसने युती करून स्थापन केलेले सरकार भाजपने सन २०१९मध्ये ऑपरेशन ‘ब्लू लोटस’ राबवत पाडले आणि स्वतःचे सरकार स्थापन केले. पण तिथल्या नागरिकांच्या हा घोडेबाजार लक्षात राहिला आणि त्यांनी भाजपला चांगलाच धडा शिकवला. आज कर्नाटक निवडणुकांचे हाती आलेले कल पाहता, भाजपच्या विरुद्ध नागरिकांच्या मनात रोष दिसून येत आहे,’ असे त्यांनी नमूद केले आहे. ‘आगामी निवडणुकांमध्ये कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातील नागरिकही राजकारणाचा आणि नागरिकांच्या मनाचा खेळ करणाऱ्या राजकारण्यांना आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडींमध्ये हात असलेल्या देवेंद्र फडणवीस, तसेच उद्धव ठाकरे यांची कूटनीती महाराष्ट्र पाहत आहे. लवकरच नागरिकांची काठी चालेल,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकच्या विजयासाठी काँग्रेसचं अभिनंदन आणि जनमताचा कौल झुगारुन घोडेबाजार करणाऱ्यांसाठी बोध! #karnatakaelections #Congress #MNS@INCKarnataka @BJP4India @Dev_Fadnavis @mnsadhikrut pic.twitter.com/Kb3tc4Y20R
— Yashwant Killedar (@YKilledar) May 13, 2023