सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर महानगरपालिकेची कारवाई मोहीम सुरू
नागरीक, दुकानदार, विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – शासनाने सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातलेली असतानाही शहरात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महानगरपालिकेच्या पथकाने सिंगल युज प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असून, बुधवारी तेलीखुंट व डाळमंडई येथे कारवाई करार ६० किलो प्लास्टिक जप्त केले. तर १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्लास्टिकमुळे वाढत असलेल्या प्रदूषणामुळे राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. अशा प्रकारच्या उत्पादनावरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अद्यापही नागरीक, व्यापारी, दुकानदारांकडून सिंगल यूज प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. माझी वसुंधरा अभियानात सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध आणून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेने यापूर्वीही सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कारवाई केली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. नागरिकांच्या प्रतिसादामुळे महानगरपालिकेला सलग दोन वर्षे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
आता अहिल्यानगर महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये सहभाग घेतला असून या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. आपले शहर सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. त्यादृष्टीने जनजागृती केली जात आहे. सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कारवाई केली जात आहे. नागरिकांनी पर्यावरणाचा विचार करून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करावा, कागदी अथवा कापडी पिशव्या वापराव्यात, दुकानदार, खाद्यपदार्थ, भाजी विक्रेत्यांनीही सिंगल यूज प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नये, शहर सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.






