माझ्या कुटुंबाने काँग्रेसला १०० वर्षे दिली, त्याच पक्षाने मला….

0
26

माझ्या कुटुंबाने काँग्रेस पक्षासाठी १०० वर्षे दिली मात्र त्याच पक्षाने मला स्पष्टीकरणाची एकही संधी न देता हाकललं असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी त्यांची खंत व्यक्त केली आहे. पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि ते निवडणूक जिंकलेही आहेत. माझ्यासोबत काय घडलं ती खूप मोठी गोष्ट आहे. ती मी नंतर कधीतरी सांगेन. मला अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागली कारण माझ्यापुढे काही पर्यायच उरला नाही असंही सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.

माझ्यावर काँग्रेसने अन्याय का केला? याचं उत्तर पक्षातले वरिष्ठ नेतेच देऊ शकतील माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही. मात्र नाशिक पदवीधर निवडणुकीत जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. मला अपेक्षा होती की काँग्रेसकडून मला तिकिट मिळेल. पण तसं घडलं नाही त्यामुळे मी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि मी जिंकूनही आलो असंही सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सत्यजीत तांबे यांनी हे भाष्य केलं आहे
ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे आमच्या कुटुंबात दुही माजली आहे अशा काही बातम्याही पसरवल्या गेल्या. खास करून बाळासाहेब थोरात नराज आहेत, ते वेगळा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत असंही बोललं गेलं मात्र मी हे सांगू इच्छितो की आमच्या कुटुंबात कुठल्याही प्रकारची दुही माजलेली नाही. आम्ही कालही एकसंध होतो आणि आजही आहोत. बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाल्याने ते आराम करत होते. मात्र त्या परिस्थितीतही काही चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या असंही सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर माझ्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाला १०० वर्षे दिली मात्र काँग्रेस पक्षाने माझं साधं ऐकूनही न घेता मला हाकललं असंही सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.