शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्रे

0
326

महिलांशी निगडित प्रश्नांसाठी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लढा उभारावा – किरण काळे ;
———————————–
प्रतिनिधी : नगर शहराच्या दुर्दशेचा फटका थेट महिला वर्गाला देखील बसत आहे. बाजारात येणाऱ्या महिलांसाठी आणि शहराच्या इतरत्र भागामध्ये सुद्धा महानगरपालिका होऊन जवळपास दोन दशकं उलटली तरी देखील साधी सार्वजनिक शौचालय उभी राहू शकली नाहीत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. शहरात महिलांच्या रोजगाराचा देखील प्रश्न गंभीर आहे. महिला सुरक्षितता हा देखील शहरात कळीचा मुद्दा आहे. अशा परिस्थितीमध्ये महिला काँग्रेसच्या नवयुक्त पदाधिकाऱ्यांनी शहरातील महिलांसाठी लढा ऊभरावा असे आवाहन, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसची कार्यकारणी मागील आठवड्यात महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत यांनी जाहीर केली होती. त्यांचा नियुक्तीपत्र वाटप व पदग्रहण समारंभ जिल्हाध्यक्ष काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, वरिष्ठ उपाध्यक्ष जरीना पठाण, उपाध्यक्ष राणी पंडित, शारदा वाघमारे, प्रभावती सत्रे, ज्योती साठे, पुनम वन्नम, ललिता मुदीगंटी, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैया गीते पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

किरण काळे यावेळी म्हणाले की, काँग्रेसमध्ये महिलांना सन्मान आहे. देशाच्या सर्वोच्च पदावरती प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने पहिल्या महिला राष्ट्रपती करण्याचे काम काँग्रेसने केले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी, प्रियंका गांधी या महिला असून राष्ट्रीयस्तरावरती सक्षमपणे नेतृत्व करीत आहेत. लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती देखील मीनाकुमारी यांच्या रूपाने काँग्रेसनेच महिलेला संधी देशात सर्वप्रथम दिली. माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची चांगली घोडदौड शहरात सुरू असून शहरात देखील महिलांचे जोरदार संघटन जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, उपाध्यक्ष राणीताई पंडित यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेस करीत आहे.

यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उषाताई भगत यांनी केले. भूमिका राणीताई पंडित यांनी मांडली. सूत्रसंचालन पूनम वन्नम यांनी केले. आभार मीनाज सय्यद यांनी मानले. पुढील आठवड्यात मंडल स्तरावरील प्रत्येक प्रभागासाठी महिला निरीक्षक नेमण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी भगत यांनी केली. यावेळी सरचिटणीस कल्पना देशमुख, अर्चना पाटोळे, मोमीन मिनाज जाकीर हुसेन, निर्मला कोरडे, सचिव इंदुमती ढेपे, हेमलता घाडगे, मीना रणशूर, शैलाताई लांडे, सहसचिव अरुणा आंबेकर, शारदा कर्डिले, समन्वयक विना बंग, रोहिणी कदम, नीता जगताप, पोखर्णाताई, कल्पना हांडे, चंदा जंगम, हलिमा शेख, छाया ढवळे आदींसह महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.