राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या दुफळीच्या पार्शभूमीवर नगर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटाने तालुका महाआघाडीची बैठक घेत आम्ही शरद पवार यांच्या सोबत असल्याचा नारा दिला. त्यास २४ तास उलटायच्या आतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नगर तालुका कार्याध्यक्ष गौरव नरवडे यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नगर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून बंडाळी केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. काही आमदार, नेते, पदाधिकारी हे अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत. तर काही जण शरद पवार यांच्यासोबत कायम आहेत. नगर – पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके हे अजित पवार यांच्या सोबत गेलेले असताना नगर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट अशा महाआघाडीची नुकतीच बैठक घेत तालुका महाआघाडी शरद पवार यांच्या सोबत कायम असल्याचे जाहीर केले होते.
या बैठकीला २४ तास उलटायच्या आतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नगर तालुका कार्याध्यक्ष गौरव नरवडे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तसे त्यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले यांना कळविले आहे. गौरव नरवडे हे आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक ओळखले जातात. तसेच त्यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मध्ये तालुक्यात युवावर्गाची मोठ्या प्रमाणावर संघटन बांधणी केलेली आहे. तसेच पदाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक नागरिकांची विविध कामे त्यांनी मार्गी लावलेली आहेत. एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्या मुळे विविध चर्चांना उधान आले आहे.
नगर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे या पूर्वी २ गट होते. एक गट नगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना मानणारा तर दुसरा शिवसेना, कॉंग्रेस बरोबर महाआघाडीत सहभागी झालेला. आता महाआघाडीत सहभागी झालेला गट शरद पवारांसोबत कायम आहे. तर त्यातील आ.निलेश लंके यांना मानणारा गट अजित पवारांच्या सोबत गेला असल्याने नगर तालुक्यात राष्ट्रवादीची ३ शकले झाल्याचे स्पष्ट झाले आहे