नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची काल जयंती होती. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सावरकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी भाजप-शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तात्पुरत्यास्वरूपात हटवण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सावरकरांच्या जयंतीला विरोध नाही. पण पुतळे हटवण्याचं काही कारण नव्हते. राजमुद्रा झाकण्याचे काम केलं गेलं. अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्याची हिंमत कशी होते?, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, असं भुजबळ म्हणालेत.