नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ काल रात्री अटक केली. नाशिक शहरातील बहिरम यांच्या कर्मयोगी नगर येथील निवासस्थानाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी बहिरम यांनी लाच मागितली होती.
एसीबीच्या पथकाने रात्री उशिरा बहिरम यांना ताब्यात घेतल्यानंतर घराची झडती घेतली. त्यावेळी त्यांना तहसिलदारांच्या घरी ४ लाख ८० हजार रुपयांची रोकड आणि ४० तोळे सोने आढळून आल्याची माहिती मिळाली पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. नरेश बहिरम यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.