राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. रात्री बाहेर आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना जयंत पाटलांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याची प्रतिक्रिया दिली. “ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांचं पूर्ण समाधान मी केलं असून, त्यांच्याकडं काही प्रश्न राहिले असतील, असं मला वाटत नाही. मी माझं कर्तव्य पार पाडलं”, असं जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांनी “कुणा एका नेत्याचं नाव घेतलं नाही तर चूक होईल, म्हणून सगळ्यांनी फोन केले असं मी सांगतोय” असं म्हणाले. पण दुसरीकडे त्यांनी अजित पवारांचा मात्र स्वतंत्र उल्लेख केला. माध्यमांनी अजित पवारांचा फोन आला होता का? असा प्रश्न केला असता “त्यांचा फोन आलेला नाही”, असं जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. त्यामुळे या दोघांमधल्या नाराजीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.