सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री, पवार-ठाकरेंचा फॉर्म्युला…

0
22

‘चालू पंचवार्षिकमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील. मात्र, २०२४मध्ये सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद, तर आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निश्चित केला होता. त्यासाठी जाणीवपूर्वक शिवसेनेचे कमी आमदार निवडून आणायचे, असेही ठरले होते. ही गोष्ट समोर आल्यामुळे शिवसेनेतील आमदारांनी उठाव केला,’ असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केला.

‘मोदी ९’ अभियानांतर्गत भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत आयोजित पक्षाच्या ‘टिफीन’ बैठकीनंतर बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

बावनकुळे म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नव्हते. त्यांच्या खिशाला पेनही नसायचा. मात्र, अजित पवार उशिरापर्यंत मंत्रालयात थांबून काम करायचे. परिणामी, शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती. २०२४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शंभर आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे आपण निवडून कसे येणार, अशी भिती शिवसेना आमदारांना होती. त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले.’