राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रविकांत वरपे यांनी राज ठाकरें यांच्यावर टीका करतानाच त्यांचा एक जुना व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलताना दिसत आहेत. या ट्वीटसोबत रवीकांत वरपे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ स्टाईलमध्ये राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, या व्हिडीओबाबत बोलताना रवीकांत वरपे यांनी राज ठाकरेंनी महाराष्ट्राची नाक रगडून माफी मागायला हवी, अशी मागणी केली आहे. “राज ठाकरेंनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. हा इतिहास खूप जुना आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी जशी शिवाजी महाराजांची बदनामी केली, त्याच पद्धतीने राज ठाकरेंनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. ही गुरु-शिष्याची परंपरा जुनी आहे. आज राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांचा आशीर्वाद घेणार आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन, नाक रगडून राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी माहितली पाहिजे असं मी त्यांना आव्हान करतो”, असं रवीकांत वरपे म्हणाले आहेत.
राज ठाकरे शंभूराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला निघालेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत दुसऱ्यांचे व्हिडीओ लावणाऱ्यांना आपण भूतकाळात काय बोललोय याची मात्र जाणीव नाही. नतमस्तक व्हायला चाललाच आहात तर आता महाराजांच्या चरणी नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी तेवढी मागा @mnsadhikrut pic.twitter.com/5BwquU4CHM
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) April 30, 2022