Monday, May 20, 2024

भाजपच्या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्याची ‘एन्ट्री’ ,खा विखे आ.राजळे यांचा केला सत्कार

अहमदनगर: राजकीय वैर आणि भारतीय संस्कृती यात समतोल साधतो तो राजकारणी नेता प्रगल्भ समजला जातो. महाराष्ट्राला या सुसंस्कृत परंपरेचा मोठा वारसा आहे. याच शृंखलेला साजेशी कृती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्याकडून झाली आणि विरोधकांनाही त्यांचे कौतुक करावे लागले. ढाकणेंच्या गावात खा.सुजय विखे आणि आ.मोनिका राजळे या भाजप नेत्यांच्या कार्यक्रमात अचानक काही असे घडले की सर्वच चकित झाले.

नगर जिल्ह्यात जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात अनेक पारंपरिक राजकीय संघर्ष करणारी प्रस्थापित घराणी आहेत. यात पाथर्डीत राजळे-ढाकणे राजकीय तीव्र संघर्ष हा टोकाचा म्हणूनच पाहिला जातो. राजळे परिवार कधी काँग्रेस, राष्ट्रवादी प्रवास करत भाजपात स्थिरावला. तर ढाकणे परिवाराचा प्रवासही इतर पक्ष, नंतर अनेकवर्षे भाजप असा होत राष्ट्रवादी पक्षात स्थिरावला.

यात राजळे परिवाराला सत्तेच्या खेळात नेहमीच साथ मिळाली. आप्पासाहेब राजळे, (दिवंगत)राजीव राजळे आणि आता मोनिका राजळे यांना सत्तेचा राजयोग आपसूक लाभला. मात्र (दिवंगत)बबनराव ढाकणे यांच्यानंतर ढाकणे परिवाराचे प्रताप ढाकणे यांना मात्र सत्तेच्या राजकीय संघर्षात राजळें कडून नेहमीच हार पत्करावी लागली. तरीही प्रतापकाकांनी वडिलांप्रमाणे एक संघर्ष योध्याच्या मुलाला शोभेल असा राजकीय संघर्ष नेहमीच पेटता ठेवला.

हा राजळे-ढाकणे संघर्ष आत्ताही कायम असला तरी ढाकणेंच्या अकोला गावात राजळे-विखे या सत्तेतल्या नेत्यांच्या उपस्थितीत चालू कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणे यांनी अचानक आगंतुक प्रवेश केला आणि एकच तणावपूर्ण शांतता पसरली. यावेळी नेमके आ.मोनिका राजळे यांचे भाषण सुरू होते. तर खा.सुजय विखे व्यासपीठावर उपस्थित होते.

मात्र ढाकणे यांनी व्यासपीठावर आल्यानंतर खा.सुजय विखे आणि आ.मोनिका राजळे यांचा शाल-श्रीफळ देत सत्कार केला आणि एकूणच सर्व वातावरण टेन्शन फ्री झाले. यावेळी कार्यक्रमात आगंतुक आले असले तरी भाजपच्या या कार्यक्रमात का आलो याचा उलगडा ढाकणे यांनी केला.

दिवंगत ढाकणे यांचे अकोले हे गाव. त्यामुळे आपल्या गावात कोणत्याही पक्षाचा नेता आला तर बबनराव ढाकणे हे आवर्जून त्यांचा सत्कार करत. गावात आलेला हा पाहुणा असतो आणि आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली संस्कृती असल्याचे यावेळी प्रताप ढाकणे यांनी सांगितले. बाळासाहेब विखे हयात असताना गावात आले असता बबनराव ढाकणे यांनी त्यांची आवर्जून भेट घेत स्वागत करत सत्कार केला असल्याची आठवण सांगितली. त्यामुळे खा.सुजय विखे हे पहिल्यांदाच आपल्या गावात आल्याचे समजल्याने आल्याचेही सांगितले.

त्याच अनुषंगाने आपल्या गावात खा.विखे आणि आ.राजळे हे आले आहेत याची माहिती मिळाली आणि अनायासे गावातच असल्याने गावची परंपरा पाळत आपण या ठिकाणी येऊन दोघांचा सत्कार केल्याचे सांगितले. एकेकाळी बाळासाहेब विखे-बबनराव ढाकणे यांची राजकीय सहमती एक्सप्रेस चर्चेचा विषय असल्याची आठवण प्रतापकाकांनी यावेळी सांगितली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles