कडबाकुट्टीत अडकून हात चेंदामेंदा…लहानग्या ‘आर्यन’ला ‘न्यूरॉन प्लस’ हॉस्पिटलमध्ये मिळाले नवीन जीवन

0
35

कडबाकुट्टीत अडकून हात चेंदामेंदा झालेल्या लहानग्या ‘आर्यन’ला न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये मिळाले नवीन जीवन

ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.अविनाश गाडेकर यांनी तब्बल दहा तास शस्त्रक्रिया करून हात केला पूर्ववत

नगर : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिखली येथील एका 9 वर्षाच्या मुलाचा उजवा हात कडबाकुट्टी यंत्रात अडकून अक्षरशः चेंदामेंदा झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या मुलाला त्याच्या पालकांनी तातडीने आधी आष्टी येथे व नंतर नगरच्या सावेडी नाका परिसरातील न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याठिकाणी अस्थिरोग तज्ज्ञ व सर्जन डॉ.अविनाश गाडेकर यांनी प्राथमिक तपासणी करून मुलाचा हात वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पालकांना विश्वासात घेऊन डॉ.गाडेकर यांनी आपल्या टिमसह तब्बल 10 तास शस्त्रक्रिया करून सदर मुलाचा हात वाचविण्यात यश मिळवले आहे. आरामानंतर या मुलाला घरी सोडण्यात आले असून त्याच्या आईवडीलांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू पहायला मिळाले.

पाटोदा तालुक्यातील चिखली येथील शिवदास लाड यांचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब. त्यांना आर्यन हा इयत्ता तिसरीत शिकणारा धाकटा मुलगा आहे. वडीलांकडे शेतात मदत करायला गेला असताना कडबाकुट्टी यंत्रात त्याचा उजवा हात अडकला. हात कोपरापर्यंत पूर्ण सोलून अक्षरशः चेंदामेंदा झाला. रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात झाला होता. हात वाचायची शक्यता नव्हती. परंतू, डॉ.गाडेकर यांनी आपला अनुभव व कौशल्य पणाला लावून मुलाचा हात वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे ठरविले. कारण इतक्या लहान वयात हात कायमचा निकामी होणे मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले नव्हते. जखमी अवस्थेत त्याला न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा त्याच्या हाताची एकच रक्तवाहिनी चालू होती, बाकी सगळ्या रक्तवाहिन्या तुटलेल्या होत्या. याही परिस्थितीत डॉ.गाडेकर यांनी अतिशय किचकट अशी शस्त्रक्रिया सलग 9 ते 10 केली. या प्रदीर्घ शस्त्रक्रियेनंतर हात पुन्हा पूर्ववत करण्यात यश आले.

आर्यनच्या आई रुपाली लाड म्हणाल्या की, धाकट्या मुलाचा हात कडबाकुट्टीत गेल्याचे पाहिल्यावर खूप धक्का बसला. त्याची अवस्था पाहवत नव्हती. सुरुवातीला त्याला आष्टीला दवाखान्यात नेले. तिथे तपासणी केल्यावर आम्हाला नगरला न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. रात्री साठेआठला आम्ही हॉस्पिटलला आलो. डॉ.गाडेकर यांनी अतिशय शांतपणे सर्व परिस्थिती समजावून सांगत आम्हाला विश्वास दिला. त्यांनी कुशलतेने सर्जरी केली. शस्त्रक्रियेनंतर मुलगा पूर्ण स्थिर झाल्याचे पाहिल्यावर आमच्या जीवात जीव आला. डॉक्टरांच्या रुपाने देवदूतच आमच्या मुलाच्या मदतीसाठी धावून आला.

न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये अडीच वर्षात न्यूरो सर्जन डॉ.अमोल कासवा, न्युरो फिजिशियन डॉ.मुकुंद विधाते, अस्थिरोग तज्ज्ञ व सर्जन डॉ.अविनाश गाडेकर यांच्या नेतृत्वात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून रूग्णांना नवीन जीवन देण्यात आले आहे. आणीबाणीच्या प्रसंगात डॉक्टर्स व त्यांची संपूर्ण टिम अतिशय कुशलतेने काम करून रूग्णांना दिलासा देण्याचे काम करीत आहे. आताही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील लहानग्याला हॉस्पिटलमुळे नवीन जीवन मिळाले आहे.