करोना महामारी मुळे लावलेले निर्बंध शिथिल झाले असल्याने यंदाच्या आषाढी वारीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा पंढरपूरची वारी निर्धोक वातावरणात भक्तांच्या मेळाव्यात व्हावी, असं चित्र आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भक्तांना ओढ लागलेली असते. दोन वर्षं इच्छा असूनही अनेकांना वारीत सहभागी होता आलं नाही. पायी चालत वारी झालीच नाही. यंदा मात्र प्रथेप्रमाणे पायी वारी आणि सर्व संतांच्या पालख्या पारंपरिक पद्धतीने विठ्ठलनामाच्या गजरात निघू शकली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदा कसा असेल याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी नुकतीच माध्यमांना दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 21 जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. यंदाच्या वर्षी तिथीच्या वृद्धीमुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहील. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने वाहन पास दिले जातील, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली.