राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला. तसेच आपण बहिण पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय समाज पक्षात घेऊन मुख्यमंत्री करणार असल्याचे भाजप नेत्यांना ठणकावूनही सांगितले.
राज्यभरात सुरू असलेल्या जनस्वराज यात्रेमुळे जानकर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ते आले होते. यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी जानकर यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर जनसंपर्क कार्यालयात झालेल्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिकाही जाहीर केली. आमदार रत्नाकर गुट्टे मेले तरी मला सोडून जाणार नाहीत, असा दावा करतांनाच माझे २०-२५ आमदार निवडून आले तर माझी बहीण पंकजा मुंडे व देवेंद्र फडवणीस हे मला फोन करतील की आता काय करायचे? असेही जानकर म्हणाले.