पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभळगाव येथे शनिवारी (दि.22) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन गटात झालेल्या तुफान हाणामारी मध्ये सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भांडणात महिला सरंपच तसेच सोसायटीच्या चेअरमनच्या कुटुंबियांचा सामावेश आहे. या हाणामारीमध्ये काही महिलांना देखील जबर मार लागला असून दोन्ही गटाच्या जखमींना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मारहाणीची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी देखील वैजूबाभळगावकडे रवाना झाले. दोन गटात झालेल्या हाणामारीचे नेमके कारण अद्याप जरी अस्पष्ट असले तरी या हाणामारी मध्ये वैजूबाभळगावच्या महीला सरपंच व त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्ती तसेच सेवा संस्थेचे चेअरमन व त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तीचा यामध्ये समावेश असल्याची माहिती समजली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाकडून या झालेल्या हाणामारी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मात्र झालेल्या हाणामारीमध्ये लोखंडी रॉड, कुर्हाडीचा वापर करण्यात आल्याने दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजले आहे.