केंद्रिय अर्थमंत्री बजेटमध्ये पीएम किसान सन्मान निधी वाढवणार? शेतकऱ्यांना आशा

0
54

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. त्यासाठीची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पीएम किसान योजनेला बुस्टर डोस देण्याच्या तयारीत आहे.

सध्या वार्षिक सहा हजार रुपये असलेली रक्कम आठ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत कशी वाढविता येईल यासाठीची अर्थमंत्रालयाच्या पातळीवर चाचपणी सुरू आहे.किसान सन्मान निधी योजनेतील अर्थसाहाय्याची रक्कम वाढविण्याचा तूर्तास कोणताही प्रस्ताव नसल्याचे मोदी सरकारने संसदेतील प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले आहे. पण पंजाब आणि हरियानामधील शेतकरी संघटनांकडून एमएसपीच्या कायदेशीर हमीसाठी सुरू झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी उपाययोजनेची गरज सरकारी पातळीवरून व्यक्त करण्यात येत आहे.

त्यासाठी कृषी खात्याची अर्थसंकल्पातील तरतूद कशा प्रकारे वाढविली जाऊ शकते याचाही गांर्भायाने विचार सुरु आहे. किसान सन्मान निधीचे सध्या १०.३२ कोटी लाभार्थी असून त्यांच्या आर्थिक मदतीसाठी ६० हजार कोटी रुपये यंदाच्या आर्थिक वर्षात खर्च होणार आहेत.

कृषी खात्याची अर्थसंकल्पातील एकूण दीड लाख कोटी रुपयांची तरतूद पाहता किसान सन्मान निधीची रक्कम जवळपास निम्मी आहे. ही रक्कम १२ हजार रुपये झाल्यास योजनेवरील खर्च थेट १.२० लाख कोटी रुपये जाऊ शकतो.

शेतकरी संघटनांसमवेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची डिसेंबरमध्ये बैठक झाली होती. केंद्रीय अर्थसंकल्प तयारीसाठी ही बैठक होती.त्यात संघ परिवाराशी संबंधित भारतीय किसान संघाने पीएम किसान योजनेचा निधी वाढविण्याची मागणी केली होती.