मुंबई : दूरदर्शनवरील बातमीपत्राचा चेहरा, बातम्यांचा बुलंद आवाज आज विरला. सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. संध्याकाळी 7 वाजता नमस्कार, आजच्या ठळक बातम्या… असा आवाज आल्यानंतर लोक टीव्हीसमोर स्तब्ध होऊन बसलेले असायचे. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाजामुळे प्रदीप भिडे हे दूदर्शनच्या बातमीपत्राचा चेहरा बनले होते. भिडे यांच्यावर आज अंधेरीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
एका चांगल्या वृत्तनिवेदकाला आवाजासोबतच भाषेवर प्रभुत्त्व मिळविणे गरजेचं ठरतं. संस्कृत भाषा ही मृत भाषा मानण्याचा प्रघात असला तरी, संस्कृतमधील श्लोक पठण, उच्चारण यामुळे वाणी स्पष्ट होते. शब्दाचा उच्चार कसा करायचा असतो, मोठा शब्द बोलताना, कुठे तोडायचा असतो, हे भाषिक बारकावे आत्मसात करणे श्रेयस्कर ठरते. अर्थाप्रमाणे विराम घेऊन शब्दफेक करता आली पाहिजे, असं प्रदीप भिडे एका मुलाखतीत म्हणाले होते. ‘बातमी सादर करताना, सरळसोट वाचली तर नीरस आणि परिणामशून्य होते, यासाठी शब्दभांडार हवे. बालसुलभ कुतूहल हवे. बातम्या तटस्थपणे, पण आवाजात आवश्यक तो चढउतार, मार्दव निर्माण करून सादर केल्या तर त्या परिणामकारक होतात ‘ असंही त्यांना सांगितलं होतं.






