मुंबई आणि भंडारा येथील निवडणुकींमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाल्याबद्दल आपण काँग्रेसला दोष द्यायला तयार नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांनी सांगितलं की, “मी काँग्रेसला दोष द्यायला तयार नाही. कारण काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे त्यावेळचे धोरण होते. फक्त काँग्रेस पक्षच नव्हता तर कम्युनिस्ट पक्षानेदेखील विरोध केला होता. कामगार लढ्यात एकत्र लढल्यानंतरही कम्युनिस्ट पक्षाने स्वत:ची ६० हजार मतं मध्य मुंबई मतदारसंघात कुजवली होती”.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “त्यावेळी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि जे राजकीय नेते होते, मी त्या राजकीय नेत्यांना दोष देणार आहे. याच्यासाठी दोष देणार आहे, कारण राखीव मतदारसंघात दोन मतदान होते आणि ते तुम्ही कोणालाही देऊ शकत होता. त्यावेळच्या राजकीय नेत्यांनी नुसतं दोन्ही मतं तुम्ही बाबासाहेबांना द्या हेच जरी सांगितलं असतं तरी बाबासाहेबांना २ लाख ४० हजार मते मिळाली असती आणि ते ७० हजार मतांनी बाबासाहेब निवडणूक जिंकले असते”.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “काँग्रेसने विरोध केला, कम्युनिस्टांनी विरोध केला हे जसं बरोबर आहे, तसं त्यावेळचे बाबासाहेबांचे जे सहकाऱ्यांनी… तेव्हा नांदेडमध्येही तेच घडलं, सोलापूरमध्येही तेच घडलं. मद्रास येथे असलेली एक केस उच्च न्यायालयात गेली आणि न्यायालयाने निर्णय असा दिला की, मतदान देण्याचा जो अधिकार आहे, तो एकाला एकच मतदान द्यावं असा नाही, तुम्हाला ज्याला मतदान द्यायचं, त्याला द्या असा आहे…. त्यामुळे ज्यांनी एकाच उमेदवाराला दोन्ही मतं दिली ते वैध ठरवण्यात आली. त्यामुळे काँग्रेसबरोबरच त्यावेळचे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जे नेते होते तेही त्याला जबाबदार आहेत असं मी मानतो”.
“मुंबईच्या उदाहरणातून शिकले नाहीत आणि भंडाऱ्यात देखील त्याचीच पुनरावृत्ती झाली”, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.






