अहिल्यानगर-एका प्राचार्यांने नऊ वर्षीय शाळकरी मुलाला अभ्यासाच्या बहाण्याने स्वतःच्या रूममध्ये बोलावून घेत, त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव उपनगरात घडली. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुधाकर देवरे (रा. उदयनराजे नगर, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव असून, तो पसार झाला आहे.
प्राचार्य देवरे हा पीडित मुलाला वेळोवेळी अभ्यासाच्या बहाण्याने स्वतःच्या रूमवर बोलवायचा. अभ्यासाच्या नावाखाली मुलाचा लैंगिक छळ करायचा. याबाबत कोणाला काही सांगितले तर आई-वडिलांना मारून टाकू, अशी धमकी द्यायचा. 24 जानेवारीला व त्यापूर्वी वेळोवेळी हा प्रकार घडला. पीडित मुलाने घरी सांगितल्यावर पालकांनी थेट पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 351 (2) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 10, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच प्राचार्य देवरे पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे अधिक तपास करत आहेत.