भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान मिळालेल्या देवेंद्र फडणवीस यांना आता राष्ट्रीय स्तरावरील राजकारणाचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने भाजपच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहे. याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशासाठी वातावरणनिर्मिती करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. कारण अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. ही मागणी भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व मान्य करणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.