राज्यात गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गौप्यस्फोट केला. पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हे गौप्यस्फोट केले आहे. तर, फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी फडणवीसांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय.
माझे सासरे सदू शिंदे हे उत्कृष्ट क्रिकेट खेळायचे. त्यांनी देशातील अनेक खेळाडूंची विकेट घेतल्या होत्या. मी सुद्धा बीसीसीआयचा अध्यक्ष राहिलो होतो. त्यामुळे खेळलो नसतो तरी गुगली कशी टाकायची हे मला माहित आहे. समोरचा जर विकेट देत असेल तर विकेट घेतलीच पाहिजे. फडणवीसांनी त्यांची विकेट गेली, हे ते सांगत नाही. पण सत्तेसाठी ते काय करू शकता हे दिसून आलं, असा टोला पवारांनी लगावला.
दुसरीकडे, जर मी धोरण बदललं तर त्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं, तसेच ती शपथ अशी चोरुन पहाटे का घेतली, असा खोचक सवाल पवारांनी विचारला.