राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही : मोहन भागवत

0
61

‘धर्म हा प्राचीन असून, धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली. ती योग्यच आहे. मात्र, मंदिराची निर्मिती होते आहे, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी भूमिका मांडली.

‘भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामातून अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशयापोटी रोज एक नवीन प्रकरण काढून चालणार नाही,’ असेही डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले. सहजीवन व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. भागवत यांचे ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय तथा राजू कुलकर्णी, ‘ग्लोबल स्टॅटॅजिक पॉलिसी फाउंडेशन’चे संचालक डॉ. अनंत भागवत या वेळी उपस्थित होते. ‘भौतिक सुखातून नव्हे, तर नैतिक तत्त्वातून भारत विश्वगुरू होईल. विश्वगुरू होण्याची भारताची क्षमता आहे. भौतिक प्रगती होत असताना नैतिक प्रगती झाल्यास ‘विश्वगुरू भारत’ ही केवळ घोषणा किंवा स्वप्न राहणार नाही, तर येत्या २० वर्षांत भारत विश्वगुरूपदाला पोहोचलेला दिसेल,’ असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला.