‘महाराष्ट्रातील भिकारी शिर्डीत’ सुजय विखे पाटील यांचं विधान चर्चेत; तर राधाकृष्ण विखे म्हणाले….

0
27

साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत भोजनावरून विखे पिता पुत्रांची वेगवेगळी भूमिका असल्याचे समोर आले आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी मोफत भोजन बंद करून साईभक्तांकडून शुल्क आकरण्याची मागणी केली होती. शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं आणि हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली. प्रसंगी या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देतात. मात्र यामुळे शिर्डीत भिकार्‍यांची संख्या वाढली असून मोफत जेवण बंद करावं आणि मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा, अशी अपेक्षा ही माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलीय.

तर दुसरीकडे सुजय विखे यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची
विरोधी भूमिका असून ते म्हणाले की साईभक्तांना प्रसाद भोजन निःशुल्क सुरूच राहील. मात्र सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचीही स्पष्टोक्ती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. शिर्डीत भिक्षेकऱ्यांचा प्रश्न गंभीर असून त्या अनुषंगाने सुजयने ते वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया शिर्डीचे आमदार तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

“सुजय विखे यांच्या शब्दाचा विपर्यास केला गेला. भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झाला होता. स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. सुजय विखेंनी जो शब्द वापरला त्यामुळे भावना दुखावल्या असतील. हे मी मान्य करतो. मात्र भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.