गाढ झोपेत असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या,अहमदनगर जिल्ह्यातील घटना…

0
50

अहमदनगर-राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे दारूच्या नशेत असलेल्या पतीने गाढ झोपेत असलेल्या आपल्या पत्नीचा लोखंडी पहारीने डोक्यावर मारून व पोटात भोकसून खून केल्याची घटना शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, अनिता सुरेश पवार (वय ३७) ही महिला झोपेत असताना तिचा पती सुरेश भानुदास पवार याने जमिनीवर खड्डे घेण्यासाठी वापरत असलेल्या पहारीने तिच्या डोक्यावर वार करून नंतर पोटात भोकसून खून केला. आपल्या आईच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने शेजारी झोपलेले ७ वर्षाची मुलगी व ५ वर्षाच्या मुलाने आरडाओरड केल्याने शेजारी धावत आले.
अनिता ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून काही शेजाऱ्यांनी धाडस करून नशेत धुंद असलेल्या सुरेश याला पकडून बांधून ठेवले. त्यानंतर या घटनेबाबत राहुरी पोलीसांना कळविले. राहुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर होऊन सुरेश याला ताब्यात घेतले. अनिता हिचा मृतदेह राहुरी ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला.