मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बऱ्याच प्रतिक्षेनंतर जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले. मात्र पालकमंत्री पदावरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे अवघ्या दोनच दिवसात 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. भाजपचे नेते जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र, आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद रिक्त राहणार आहे. मंत्री भरत गोगावले रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना पदापासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त करत राजीनामे दिले होते. दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु होती. त्यानंतर दोन जिल्ह्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या “नाशिक” आणि “रायगड” या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस पुढील आदेशापर्यंत, याद्वारे, स्थगिती देण्यात येत आहे.
3. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११९२०५३२५५७०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारुन सहपालकमंत्रीही नेमले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे व मुंबई शहराचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याबरोबरच बहुचर्चित बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगलीची जबाबदारी देण्यात आली आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्रीपद जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच सोपवण्यात आले आहे.






